बारामती सत्र न्यायालयाचा दणका , अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी बापाला जन्मठेप तर सावत्र आईची निर्दोष मुक्तता. सावत्र आईचे वकील म्हणुन अॅडो .अमोल सोनवणे यांचा योग्य युक्तीवाद केला .
बारामती सत्र न्यायालयाचा दणका: अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी बापाला जन्मठेप; सावत्र आई निर्दोष मुक्त!
ॲड. अमोल सोनवणे यांच्या प्रभावी युक्तिवादांमुळे सहआरोपी सावत्र आईची निर्दोष सुटका.
SB 24 NES LIVE- बारामती | प्रतिनिधी
अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी बारामती येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने पिडीतेच्या नराधम बापाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच पिडीतेला पाच लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे, याच खटल्यातील सहआरोपी असलेल्या सावत्र आईची न्यायालयाने पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे. एकाच खटल्यात मुख्य आरोपीला कठोर शिक्षा आणि सहआरोपीची निर्दोष मुक्तता झाल्यामुळे बारामती सह संपूर्ण परिसरात या निकालाची जोरदार चर्चा सुरू आहे.
वीटभट्टीवरील वास्तव्यातील धक्कादायक घटना
या प्रकरणातील मुख्य आरोपी हा पीडितेचा स्वतःचा जन्मदाता वडील आहे. सन २०२२ मध्ये तो पीडिता आणि तिच्या सावत्र आईसह वीटभट्टीवर कामासाठी गेला होता. २७ डिसेंबर २०२२ पासून वडिलांनी अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केले आणि याबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली, असा गंभीर आरोप होता. दरम्यानच्या काळात पीडिता गर्भवती असल्याची माहिती समोर आल्यानंतर वीटभट्टी मालकाच्या पत्नीने तिच्या नातेवाईकांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर पिडीतेला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सावत्र आईवरही गंभीर आरोप होता.
तपासादरम्यान, पिडीतेने घडलेल्या प्रकाराची सर्व माहिती सावत्र आईला दिल्यानंतर तिनेही जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आणि कथित गुन्ह्याला प्रोत्साहन दिल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या आरोपावरून पोलिसांनी सावत्र आईलाही अटक केली होती आणि तिला येरवडा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. तिच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले होते.
ॲड. अमोल सोनवणे यांचा प्रभावी युक्तिवाद ठरला निर्णायक
आरोपी क्रमांक २ असलेल्या सावत्र आईच्या वतीने ॲड. अमोल सोनवणे यांनी न्यायालयात बाजू मांडली.
साक्षीदारांच्या उलटतपासणीदरम्यान प्रकरणातील महत्त्वाच्या बाबींची सखोल छाननी करण्यात आली. आरोपी क्रमांक २ हिच्यावरील आरोपांचे स्वरूप, तिची कथित भूमिका आणि तिच्याविरुद्ध उपलब्ध पुरावे यांचा स्वतंत्रपणे विचार व्हावा, असा युक्तिवाद बचाव पक्षातर्फे करण्यात आला.
“एखाद्या व्यक्तीविरुद्ध गंभीर आरोप असले तरी, तिची गुन्हेगारी जबाबदारी कायदेशीर पुराव्यांच्या आधारे सिद्ध होणे आवश्यक असते,” या कायदेशीर तत्त्वावर भर देत ॲड. सोनवणे यांनी लेखी व तोंडी युक्तिवाद केला. साक्षीदारांच्या साक्षींचे परीक्षण आणि कायदेशीर मुद्द्यांची अचूक मांडणी यामुळे न्यायालयाचा सावत्र आईच्या भूमिके पाहण्याचा दृष्टिकोन स्पष्ट झाला.
बापाला जन्मठेप आणि ५ लाखांची भरपाई
या खटल्यात एकूण १२ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयासमोर आलेले पुरावे, साक्षी आणि दोन्ही बाजूंचे म्हणणे विचारात घेतल्यानंतर, अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी मुख्य आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच, पिडीतेला ५ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. याचवेळी, पुराव्यांचे स्वतंत्र परीक्षण करत न्यायालयाने सावत्र आईची निर्दोष मुक्तता केली. गंभीर गुन्ह्याच्या खटल्यात प्रत्येक आरोपीची भूमिका स्वतंत्रपणे तपासणे किती गरजेचे असते, हे या निकालाने अधोरेखित केले आहे.या संपूर्ण खटल्यात ॲड. अमोल सोनवणे यांना सहकारी विधीज्ञ अविनाश जाधव, रितिक गायकवाड, राजरत्न ताकतोडे, वैभव झगडे, राहुल गिरमे, सागर खरात, ॲड. रवींद्र सोनवणे आणि लीगल एड पॅनेलचे ॲड. सुमित पाटील यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले.

SB 24 NEWS LIVE पोर्टल वर बातम्या व जाहीरातीसाठी
मुख्यसंपादक -शरद भगत.
संपर्क -7756089343






